Wednesday, November 19, 2025

श्री

श्री 

अनुभवाच्या रूपाचे कारण किंव्हा स्थान, हे भगवत माध्यमात *स्थित* असते. त्या माध्यमाच्या कार्यामुळे अनुभव होऊ पाहतात, मन होते आणि असंख्य काल्पनिक विश्व मनात येते. त्यात बदल, तात्पुरतेपण असे सारे घटक सामावले गेलेले असतात किंव्हा तसे _जाणवतात_. त्याच्यातच अहं वृत्ती मिसळली असते किंव्हा एक घटक म्हणून सामील असते. प्रकार असा आहे की अहं वृत्ती "घटक" आहे आणि त्या घटकाचे परिणाम म्हणजे वैयक्तिक स्मरण होऊ पाहणे, जेणे करून आपण कर्तेपणा स्वतःवर ओढून घेतो. म्हणून शुद्ध होण्याची गरज होते आणि ती सुरुवात स्वतःच्या अनुभवातून करायला लागते. 

म्हणजे भगवत शक्तीचे कार्य ध्यानी यायला लागते, तरच अहं वृत्ती शिथिल होण्याची शक्यता असते. अहं वृत्तीही गूढ आहे. ती का असते, हे भगवंतालाच ठाऊक! शब्दात सांगायचे झाले तर सर्व तात्पुरत्या रूपांना - विचार, भावना, देह ह्यांना धरून राहिल्या मुळे तसे भाव प्रज्वलित होतात. देह हा आकार असावा, पण ती एक शक्तीही आहे आणि तिच्याशी संबंध ठेवल्यामुळे तिचे गुण मनात येतात, म्हणून भीती. 

म्हणून सत्य ओळखण्याची नितांत गरज असते, स्वतःसाठीतरी. 

दुसरी गोष्ट ही, की स्वतःची स्थिती किंव्हा प्रवाह पूर्णपणे दुसऱ्यांना सांगणे कठीण आणि त्यातून इतर लोकं काही मार्ग दर्शन देतील का, तर तशी काही खात्री नाही. हा कुणाचा दोष म्हणता येणार नाही...ते तसे असते आणि स्वीकारावे लागते. म्हणजे पूर्ण कार्य भगवंताचे असते. म्हणून अभ्यास, अनुभव, भोग, परिणाम स्वतःला सामोरे जायला लागते आणि त्यातून शांती भाव आत्मसात करायला लागते. तो सैय्यम आणि श्रद्धा भगवंताकडे प्रार्थना करत मागून घ्यावा.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home