Tuesday, June 06, 2023

श्री

श्री

जाणीव होणे आणि त्या बद्दल वाचता करणे ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. वाचता करणे हे बाह्य गोष्ट आहे – एखादा धूर्त व्यक्ती देखील संत असल्यासारखा बोलू शकतो, पण मूलतः दोघांमध्ये जाणीवेचा किवा “भावाचा” किवा कर्माच्या पाठीमागच्या हेतूचा फरक आहे. तो फरक फक्त शुद्ध अंतःकरण असलेल्या व्यक्तिला कळतो. हेतू किवा भाव ही गोष्ट अंतरंगातली आहे  - आतली आहे, मनातली आहे, मनाच्या खोल दडलेल्या वृत्ती संबंधी आहे. ह्याचा अर्थ एवढाच कि आपण वृत्ती प्रमाणे जग घडवतो, अनुभवतो, किवा जाणीव करून घेतो. बदल करून आणायचाच असेल तर तो वृत्तीतील घडवून आणायला हवा म्हणजे आपल्यासाठी जग बदलल्याप्रमाणे होईल.

तर साहजिकच प्रश्न असा आहे कि वृत्ती तरी काय आहे आणि ती कशी येते? हे फार गूढ प्रकरण आहे आणि थोडक्यात सांगायचे झाले, तर वृत्ती परमात्मा मध्ये “निर्माण” होते आणि ती बर्याच कारणांमुळे प्राणाचं आणि देहाचं आवरण घेते. आवरण घेताना एका प्रकारचं मानसिक जाळ तैय्यार करते ज्याचा विस्तार किटाणू पासून पूर्ण विश्वाला व्यापून राहतो. त्यातील आपण एक “कण” म्हणून स्वतःला ओळखतो  - त्या कणाला मन आणि शरीर अश्या ढोबळरित्या दोन अंगाने आपण ओळखतो. ह्याचाच अर्थ असा होतो कि सत्य आपल्याला एका कणासारखं दिसत. ते पूर्ण स्वरूप दाखवू शकत नाही.

ह्या कणाचा स्वभाव असा होतो कि “मीच सर्व करता आहे आणि मन आणि शरीर हे सर्व सत्य आहे”. बर्याच कारणांची उत्तरं ठाऊक नसतात, त्यातून अभिमान आणि भीती तैय्यार होते, आपण ते दूर करायला खूप कर्म आणि कष्ट करतो, आणि पदरी शाश्वती मिळतच नाही. आपल्याला ह्याच मनस्थितीत बदल घडवून आणायचा असतो.

वास्तविक हे ओळखता हव कि हे सर्व कर्म आणि विश्व घडवणाऱ्या वृत्ती असतात आणि ते आपल्याकडून कृती करवून घेतात. कृती म्हणजे कर्म, बदल, धडपड, आणि बर्याच गोष्टी. वृत्तीचं “ओझं” आपण आपल्याकडे घेतो म्हणून चिंताग्रस्त होतो. तर आपण वृत्ती नव्हे. तरीही नुसता विचार करून काम भागत नाही – त्याला बुद्धीच्या पातळी मधून, भावनांच्या पातळी मधून आणि कर्माच्या पातळी मधून योग्य क्रियेला (हेतू) आचरणात आणायला लागत.

आपल्याला काय करायला हव ते सध्या कळणार नाही आणि अशी शंका येत राहील कि पूर्ण सत्य कळेसतोपर्यंत बरोबर कृती कशी करणार मी? तर थांबण्याची गरज नाही. कृती मधूनच ह्याचं उत्तर मिळत जाणार आहे.  तीन पायरया सांगितल्या आहेत – (१) कर्म सगळे भगवंताला अर्पण करणे (२) पवित्र विचार, भावना उत्तेजित करणे (३) भगवंताच्या अस्तित्वाबद्दल श्रद्धा ठेवणे. ह्या गोष्टी केल्याने अंतःकरणात काळाने निश्चित बदल घडून येईल. आपल्या वृत्ती स्थिरावतील. आपण शांत होऊ.

कर्म योग ह्याला म्हणतात. अनासक्ती म्हणजे हेच. वैराग्य म्हणजे हेच. पूर्ण प्रेम म्हणजे हेच. विवेक बुद्धी म्हणजे हेच. श्रद्धा म्हणजे हेच.

हरी ओम.


0 Comments:

Post a Comment

<< Home