Saturday, October 21, 2023

श्री

श्री

श्री, आपण सर्व गोष्टी “शब्द” ह्या पार्श्वभूमीवर बघतो. त्यालाच धरून राहतो आणि त्या शब्दाच्या मर्यादित अर्थाला सत्य मानतो. शब्द निर्माण करणे आणि त्याला धरून राहणे हि वृत्ती आहे मनाची. शब्दातून आकार, परिस्थिती, स्थळ, काळ – अश्या सार्या गोष्टी साठवलेल्या असतात आणि त्यातून परावलंबन, विचार, भावनांचा उद्रेक वगैरे. किवा अस्तित्वाची जाणीव “शेवटी शब्दात प्रकट होते”. थोडक्यात “दृश्य जगात येणे” म्हणजे “शब्दात मांडणे”. आपण फक्त शब्द घेऊन वावरतो का त्याही पलीकडे अदृश्य अस्तित्व आहे? शब्दाला स्वतंत्र अस्तित्व आहे कि ते अदृश्यातून येत? आणि ते अदृष्यातून निर्माण होत असेल तर अदृष्याचा स्वभाव आणि दृश्याचा स्वाभाव काय असतो आणि त्यात सुद्धा संबंध असतो का आणि तो संबंध बुद्धीच्या चौकटीच्या पलीकडे असतो का? ह्या प्रश्नांची उत्तरे मिळणे म्हणजे शांत होणे, कारण शांत व्हायला विचारांची एक मर्यादा आहे आणि त्या मर्यादेच्या पलीकडे आपल्याला अस्तित्व जाणवायला हवं.

बुद्धी, भावना, मन, शरीर, परिस्थिती – हि एक अवस्था आहे. ती आपल्याला विचारात गुंतून ठेवते आणि ‘आपल्याला सर्व गोष्टी कळायला हव्या आणि सोडवायला हव्या आणि मुळ उगम कळायला हव’ – अस काहीतरी मनोधारणा घेऊन आपण वावरत असतो. ह्या अट्टाहासापोटी आपण दुख भोगतो.  “कळायलाच पाहिजे” अस समजणे हि चूक आहे. आपला काहीही अधिकार बनत नाही गोष्टींचा उगम माहीत करून घ्यायला आणि आपल्या तावडीत ठेवायला.

थोडक्यात, विचारांच्या पलीकडे “होणे” हि गरजेची बाब आहे. म्हणजे अट्टाहास सोडणे, समर्पण करणे, मूळ न सापडण्यास चिंता न करणे, सर्व एकच सत्य आहे ते ओळखणे, श्रद्धा वाढवणे, गोष्टींवर श्रद्धा असणे, घडामोडींवर आपली शांतता निर्भर न होऊ देणे, शांतता सर्व गोष्टींच्या पलीकडे नेणे, चिंता सोडणे, कालची, आजची आणि उद्याची काळजी न करणे, मर्यादा ओळखणे, विचारांचा स्वाभाव ओळखणे, सोडवण्याचा अट्टाहास न धरणे वगैरे...

ह्या सर्व गोष्टी भगवंताच्या अनुसंधानामुळे होतात.

हरि ओम.  

 

 


0 Comments:

Post a Comment

<< Home