Friday, November 06, 2026

श्री

  श्री 

 सर्व अर्पण करावे आपुलकीने. त्यातच शांती भाव अनुभवायला मिळत असावा. शांती अनुभव जिवंत किंव्हा अस्तित्वाचे सत्य किंव्हा शुद्ध स्थिती ओळखावी, ज्यात मन विलीन होते किंव्हा शांतीचे स्पंदने आतून प्रकट होते. 

 आयुष्य जसे बघू तसे ते दिसत राहते. हातातून निसटून जाते असे बघितले, तर तेच अनुभव येत राहतील. शांतीच्या प्रश्वभूमीवरून जाणून घेतले, तर तेच अनुभवास येईल. 

 त्रास किंव्हा कष्टी होऊन काहीही उपयोगाचे नाही, कारण ती भूमिका सत्य नाही...म्हणजे त्या आसक्तीला काही अंत नाही...कारण हा सर्व प्रकार _निर्मितीचा_ असतो आणि तो भगवंताच्या इच्छेमुळे साकार होतो. 

 आपण अस्तित्वात आहोत...शक्तीने एक रूप पदार्पण केले आहे. तर ते रूप प्रयत्नाने शांतही होऊ शकते. शांत म्हणजे सत्य होणे, संपणे असा अर्थ होत नाही. 

 पहिले आपण इथे कश्यासाठी आलो आहोत, हे मान्य होऊ द्यावे. ते मान्य होणे, म्हणजे शांती संक्रांत होण्याचे पहिले पाऊल. आणि संपूर्ण विलीन होणे म्हणजे शांतीचे शेवटचे पाऊल. 

 हरि ओम.

 

 श्री 

 Role play. भूमिका किंव्हा रूप किंव्हा कार्याचा अर्थ किंव्हा भाव - असे आपण पदार्पण केलेले असते. त्याला भगवंताची इच्छा, असे ओळखावे. म्हणजे आपण रूप मान्य करतो आणि त्या बरोबरीने सर्व प्रवास करतो, पण हे कुणासाठी आणि कश्यासाठी करतोय, हे विसरत नाही. म्हणजे सर्व घडामोडीत किंव्हा हालचालीत किंवा परिस्थितीत, भगवंताला विसरत नाही. 

 त्यालाच सर्व ध्यानी येणाऱ्या प्रवाहाला "पाहुण्याचे" स्वरूप देणे, असे म्हणावे (Jalaluddin Rumi), किंव्हा स्थिर होणे, किंव्हा श्रद्धा वाढवणे, किंव्हा शुद्ध होणे, किंव्हा कर्तव्य करणे, किंव्हा सूक्ष्मात पदार्पण करणे, किंव्हा स्वच्छ हेतू असणे, किंव्हा सत्य ओळखणे - असे अनेक पद्धतीत स्पष्ट केलेले आढळते. 

 कदाचित सकाळची वेळ आणि रात्रीची वेळ, ही जाणीव प्रज्वलित ठेवायला उपयोगी ठरत असेल....की _पलीकडून_ कार्य होते आणि म्हणून सर्व काही गूढ असते आणि त्यावरून परिस्थितीकडे बघण्याची जाणीव शिथिल होते, अधिक स्वीकारण्याकडे प्रवृत्ती होते, सिद्ध करण्याची धडपड नसते, वगैरे. 

 जसा दिवस पुढे गेल्या सारखा वाटतो, तेव्हा इतर प्रवृत्तीत मन गुंतायला लागते आणि निर्माण केलेल्या परिस्थितीत आपण मग्न होतो आणि त्या परिणामांना सामोरे जावे लागते. हे चक्र दररोज चालू राहते. 

 तेच चक्र शिथिल करण्यासाठी किंव्हा श्रद्धा वाढवण्यासाठी भगवंताचे चिंतन सतत चालू ठेवायला लागते. लक्ष नामस्मरणाकडे द्यावे दृश्यात वावरत राहताना. 

 हरि ओम.

 

 श्री 

 आपण अस्तित्व आहोत, त्या शक्तीचे कार्य आहोत. म्हणून त्या कार्याचा एक परिणाम म्हणजे रूप आणि अनुभव संक्रांत होत राहणे, प्रवाह जाणवणे आणि प्रवास असणे - असे ध्यानात येणे आले. प्रवासात बऱ्याच गोष्टींना सामोरे जाणे भाग पडते - जसे की प्रश्न, अर्थ, परिस्थिती, शोध, घटक, नाती, व्यवहार, निश्चय, हालचाली, वगैरे. 

 हाच मार्ग असतो शांत होण्याचा, म्हणून जे येत राहते, ते येऊ द्यावे, कर्तव्य करावे आणि श्रद्धेने फळ स्वीकारावे. हा भाव आत्मसात होणे गरजेचा असतो. तो भाव होण्यासाठी प्रवास ध्यानी येतो.

 हरि ओम.

 

 श्री 

 विचारातून कार्यही होऊ शकते (रेष किंव्हा संबंध किंव्हा हालचाली करणे) किंव्हा त्यातून स्वतःच्या प्रवाहावरही प्रकाश पाडू शकते. दोघांवर असीम श्रद्धा लागते आणि दोघांवर उगाचच शंका घेऊन उपयोगाचे ठरत नाही. शंका घ्यावी तर योग्य मार्गावर जाण्यासाठी आणि त्यासाठीच शंकेचे स्थान आहे, हे ध्यानात येऊ द्यावे. 

 सत्य गवसण्यासाठी शंका असते. ती स्वतःला बेचैन करू शकते, पण तो शंकेचा स्वभाव झाला, आणि कुठल्याही स्वभावाचे मूळ भगवंताकडे नेते, म्हणजे तो स्वभाव शांत होण्यासाठी भगवंताच्या कार्याचे ध्येय मनात आणावे लागते. 

 योग्य मार्गाच्या परिणामांवर श्रद्धा ठेवावी. सैय्यम ठेवावा आणि शांत रहावे. आपण भगवंतासाठीच आहोत.

 हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home