Wednesday, November 12, 2025

श्री

श्री 

मी आज कॉलेजला एक गोष्ट बघितली...की माणसं उगाचच काहीही प्रश्नात स्वतःला बुडवून घेतात, त्यात गुंतून राहतात आणि असा कदाचित आव आणण्याचा प्रयत्न करतात, की तो विषय किंव्हा प्रश्न सोडवता आला मग प्रलय थांबू शकेल त्यांच्यामुळे!....

सत्य पहिले, तर तसे काही होत नसते! आपण मुळात विषय निर्माण करतो आणि त्यात विचारांचा समावेश होतो, इथेच आपले स्मरण अस्थिर होते आणि अहं भाव वाढत राहते. "समावेश होणे" हे अस्तित्वाचे अपरिहार्य गुण आहे, तर ते होणार, जर विषय प्रकट केला तर. गुळाला मुंगळा कसा चिकटतो, तसे विषयांना आपले मन! मान मोडेल पण गुळ सोडणार नाही, अश्या चिवट भावनेतून आपण विषय सोडत नाही, जरी त्यांच्या मुळे आपला घात झाला तरीही! म्हणजे गुंतून राहणे हे इतके नैसर्गिक प्रकरण आहे, की आपण कसे विषयाधीन होतो, ह्याचा ठाम पत्ता आपल्याला लागत नाही! ह्याचाच दुसरा अर्थ की वृत्ती कशी गुंतले, हे गूढ प्रकरण आहे आणि आपण सूक्ष्म झाल्या शिवाय कळत नाही!...म्हणून नामस्मरण करावे, म्हणजे विचारांची धुंदी कमी होत जाईल. 

दुसरे म्हणजे लोकांना वाटू शकते की खूप बोलून मन "मोकळे होईल" किंव्हा "गप्प बसून" व्याधी टळली जाऊ शकेल! माझ्या मनातही असे विचार येतात...! पण परत असे केल्याने कधी ना कधीतरी स्वतःलाच जोराचा फटका बसतो. ह्याचा अर्थ हाच की अनुभवातून पळवाट नाही आणि त्यावर आपला काहीही हक्क नाही. जे वाट्यास येऊ इच्छिते, ते येणार. म्हणून सर्व काही येऊ द्यावे. 

तिसरी गोष्ट ही की आपल्याला वाटते की शेवटी देहाचे काय होईल? काय होणार?! आपण म्हातारे होऊ, सुरकुत्या येतील, दिसणार नाही, व्याधीने ग्रासून जाऊ वगैरे! आणि एक दिवस, आत्ताची स्थिती सोडून वेगळ्या रूपात प्रवेश करू...मग हे सत्य का टाळावे आणि त्याला का घाबरावे आणि का मान्य करू नये?!

नैसर्गिक अस्तित्वात होणारा प्रवास आत्मसात करणे आहे आपल्याला. तो प्रवास ध्यानी असत नाही, म्हणून देहाच्या प्रारब्धाला धरून राहतो. तसे करू नये. शांत झालो की सर्व ध्यानात येते.

हरि ओम

0 Comments:

Post a Comment

<< Home