Monday, October 28, 2024

श्री: साथ

श्री: साथ


जिवंतपणा हा अनुभव आहे मानवाला. त्या अनुभवात बदल, गुंतून राहणे, परावलंबन, *बंधन*, तत्पूर्त असणे, अस्थिर वाटणे, विचार आणि भावना चक्रात कायम राहणे या गोष्टी माणूस भोगतो. 

मनोरचना *प्रमाण* मानून, त्याची जाणीव ठरवली जाते - म्हणजेच की विचार धारांचा तो परिणाम भोगतो. विचारांचा एक स्वभाव आहे, ज्याचे मूळ खूप सूक्ष्म स्थितीतून घडले गेले आहे. त्या स्वभावात आपण जग अनुभवतो आणि त्यामुळे बंधने वाटतं राहतात, ज्यांना सामोरे जायला लागते. जे आहे, ते असे आहे. ते कार्य म्हणून बघावे आणि सामोरे जात राहणे. 

दररोज सकाळ, दुपार, संध्याकाळ होणार...पावसाळा, हिवाळा, उन्हाळा होत राहणार, पाणी भरणार आणि अटणार, पकड मध्ये येणार आणि सुटणार, चढ उतार असणार, गती आणि स्थगिती असणार, भरणे आणि मोकळे होणे असणार.

वरील क्रियांमध्ये अहं किंव्हा "मी" हा भाव उमटतो. ती दैवी इच्छा मानायला हवी. तो भाव उमटण्याची, प्रकट होण्यासाठी भगवंताचे विस्मरण होणे आहे. म्हणजे मूळ न कळणे आहे आणि म्हणूनच दृश्याच अस्तीत्व अनंत वाटते (आणि भीती राहते). हे ही दैवी इच्छा मानायला हवी. 

ओघाने आपण असे म्हणू शकतो की मूळ माहीत नाही, याचा अर्थ तो मूळ आपल्या ध्यानाच्या पलीकडे आहे, जो शांत आहे. तरीही त्या शांततेची कायम साथ आपल्या आतच असते, ज्यावरून आपला भाव उदयास येतो. 

जरी भीती वाटली, तरीही मुळची शक्ती किंव्हा शांतीची साथ कायम आहे. ह्यावर श्रद्धा ठेवणे आणि ती शांतता ध्यानात आणणे. त्यासाठी प्रपंचात वावरत असताना भगवंताच किंव्हा नामाच स्मरण सतत जागृत ठेवणे.

हरि ओम.


 श्री 

विचार येत राहणे आणि निघून जाणे ही खूप सूक्ष्म आणि मोठी शक्ती आहे. *शक्ती* म्हणजे अस्तित्वाचे कार्य, बदल, गुंतून राहणे, चक्र, वृत्ती, आकार आणि दृश्याचा भाव. 

त्याच शक्तीचे आपण एक भाव आहोत आणि त्यामुळे रूप किंव्हा स्वभाव धारण केलं आहे. दृश्यात वावरणे म्हणजे त्याचे संस्कार ध्यानात येणे. पण शक्तीचे जागे होणे म्हणजे अनुभव तात्पुरते आहेत, मी तात्पुरता आहे हे समजणे आणि मग शोध सत्याचा होणे. *जागे होणे* हे वैशिष्ट्ये मानवाला दिले आहे, म्हणून सतत धडपड आणि प्रयत्न करणे भाग आहे. आपण किती विषयाधिन आहोत हे कळते आणि किती परावलंबी आहोत विचारांच्या स्वभावामुळे हे ही कळते. चुकीचा समजुतीमुळे गोष्टींच्या हालचाली मनावर संस्कार करतात आणि आपण फळ भोगतो. 

इथून सुरुवात आहे आणि मला वाटते, त्याला काहीही हरकत नाही. आत्ता जर असे कळले तर ठीक आहे. त्यातून पुढचा टप्पा गाठला जाणार आहे. इथ पर्यंत जर आलो आहोत, तर पुढेही काहीतरी उमगणार! अगोदर, मग, इथे किंव्हा तिथे ह्यावर विचार ठेवण्याची गरज आहे का? हे स्वतःला विचारणे. क्षण कसा निर्माण झाला आणि कुणी दिला हे ही ओळखावे. समस्या का येतात आणि सोडवण्याचा अट्टाहास घेणे म्हणजे काय? हे सर्व *क्रिया* म्हणून ओळखू शकू का? अस्तित्व ही जाणीव आहे आणि क्रिया देखील. ते असणारच आहे, म्हणून त्याला कार्य म्हणायचे. 

बदलांचे स्वरूप, आकार, येणे आणि जाणे हे माझ्या किंव्हा कुणाच्याही शक्तीच्या आकलनेत नाही, म्हणून शांत राहावे. मी हा भाव निर्मिती मधून आला आहे, त्याला तसे काही तथ्य नाही, किंव्हा तो असायला हवा असे काहीही नाही. म्हणजे आपण निर्हेतु होऊ शकू का? आणि तो काय असतो अनुभव?!...

हरि ओम.


श्री 

अस्तित्व हे सत्यपणा स्थळ किंव्हा काळाच्या सांगण्यावर आधारित नसते. स्थळ आणि काळ हे हालचाली आहेत, गुण आहेत, गती आहे, गुंतागुंती आहे, दृश्य आहे, स्वभाव आहे, शक्ती आहे. म्हणजेच की क्रिया आहे. 

अस्तित्व किंव्हा भगवंत " शक्तीचे रूप घेतो आणि दृश्यात प्रकट होतो " असे म्हणतात. म्हणजे कुठल्याही हालचालीच्या पाठीमागे त्याची संकल्पना असते. ते ओळखणे. 

हे सरळ जरी मांडले तरी त्याकडे ध्यान बसायला प्रयास घ्यायला लागतात आपल्या मनोरचनेमुळे. असो, तसे तर तसे. त्यातही भगवंताचे प्रबोधन असणार, नाहीतर काय आपण इथपर्यंत आलो?! 

शक्ती आपणही आहोत आणि ती जग निर्माण करते आणि त्यात आपण वावरत राहतो. हे ओघाने आले. तर त्या शक्तिकडे जर भक्ती किंव्हा प्रेम भावनेतून बघितले किंव्हा जाणून घेतले तर तिचे परिणाम आपण आनंदाने स्वीकारू. 

आहे प्रकरण ते गूढ आहे. बुद्धीच्या दृष्टीने कुठली वृत्ती कशी उमटेल आणि काय करायला लावेल, हे कुणाला माहीत नाही - मला किंव्हा जीवाला माहीत नाही. त्या अर्थाने मी भगवंताचा झालो आणि तो म्हणेल त्या पद्धतीने मी अनुभव घेतो. म्हणजे त्याची सेवा करणे हे पक्के झाले. हा "मी" भाव जो निर्माण होतो, तो विरोधाभासी आहे. त्याचा काहीही उपयोग नाही आनंद मिळवण्यासाठी. 

दृश्याचे संस्कार इंद्रियांच्या आहारापासून सुरुवात होतात. म्हणून इंद्रियांच्या नादी किंव्हा चक्राच्या नादी लागू नये. जे येणार ते जाणारच आहे, हा नियम आहे. ते ओळखून भगवंताच्या स्मरणात रहा.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home