Saturday, June 21, 2025

श्री

 श्री 


भीती हा खूप गूढ प्रकार आहे. भीतीपोटी आपण इतके संबंध निर्माण करत राहतो, गुंतून राहतो, अपेक्षा ठेवतो, धावपळ करतो, रागावतो, त्याला काही अंत नाही. भीतीचे दुसरे नाव माया किंव्हा अहं वृत्ती. भीतीचे मूळ कुठून येते किंव्हा ते कसे निर्माण होते, हे शांतपणे बघावे.

दुसऱ्यांची भीती घालवणे महा कठीण, मग ती बायको असो किंव्हा आई वडील, किंव्हा कुठलेही दुसरे किंव्हा आपल्यापेक्षा वेगळे रूप किंव्हा कुठलीही स्थळ + काळाची परिस्थिती. ह्याचा अर्थ की "वेगळा" भाव धारण करणे, ह्यात खूप क्रिया होत राहतात आणि शेवटी जड + विविध आकार आणि परिस्थिती आपण अनुभवतो...तसा _संबंध_ आपण ठेवतो, गुंतून राहतो. परिस्थिती प्रवाह सारखी बदलत असलेली जरी वाटली तरीही आतील उदयास होणारा भाव तसाच आपण धरून ठेवतो. मग जग सुधारायला हवे, अशी अपेक्षा करणे किती पोकळ ठरेल?! 

जग दुसरे तिसरे नसून, ते आतील भावनेच किंवा वासनेचे प्रतीक आहे. त्यालाही आपण चक्र म्हणू. मुळातील प्रश्न स्वतःचे असतात, स्वतःसाठी असतात, स्वतः उत्तर कळण्यासाठी असतात - त्यात दुसऱ्यांना दोष देऊन उपयोगाचे ठरत नाही, कितीही जरी त्रास झाला तरीही. 

ही परिस्थिती समाधानी कशी वाटेल आपल्याला, हे बघावे. समाधान होणे म्हणजे काय, हे ओळखावे आणि तसा अभ्यास हाती घ्यावा. बघितलं तर आपण दृश्याच्या प्रभावाखाली हैराण झालेलो असतो, पण मान्य करायचं नसतं! कुणी सत्य सांगितलं तर ते ऐकवत नाही आणि त्यालाच दोषी ठरवायला निघतो! 

सत्य पचनी व्हायला भगवंताला विसरू नये. भगवंत स्मरणात ठेवणे म्हणजे ती काही वास्तू नाही, ती शुद्ध आणि स्थिर स्थिती होण्याचा प्रयत्न आहे. 

बाकी त्याचे आपल्याकडे लक्ष आहेच...

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home