Wednesday, February 18, 2026

श्री

श्री 

 

कुठलीही परिस्थिती, स्वतःच्या मनोरचनेप्रमाणे तशी गुण घेऊन जाणिवेत येते - म्हणजेच सतत बदलणारी, तात्पुरती, विघटित, अर्धवट, रूप आणि आकार घेत, गुंतागुंतीची, मूळ न सापडणारी वगैरे. थोडक्यात परिस्थिती ही अस्तित्वातील एक "संकल्पना" ठरते ज्यात अनेक क्रियेतून ती निर्माण होते आणि बदलत राहते आणि त्यात आपण मुल्य देऊन स्वतः गुंतून राहतो. दुसऱ्या अर्थाने मन आणि परिस्थिती ह्याचा संबंध प्रस्थापित होत असतो, ज्याला आपण द्वैत म्हणुया किंवा दुहेरी परिणाम किंव्हा चक्र किंव्हा भाव. 

 

 _संबंधांची_ जाणीव म्हणजे वासना, विचार, भावना आणि देह. ह्या सर्वांना एकत्रित आपण "मी" असा भाव लावतो (लावला जातो). एवढा विस्तारलेला प्रकार "मी" आहे! 

 

म्हणून त्रास का होतो किंव्हा कष्टी का होतो, ह्याचे थोडे तरी उत्तर मिळवायला मदत होऊ शकते. ह्यातून हे ही कळू शकते की वरील कार्याला अंत नसतो. ह्या सर्वांचा उगम, वावर, बदल, निघून जाणे हे भगवंतावर आधारलेले असते, कुठल्याही रुपावर किंव्हा स्थितीवर नाही. थोडक्यात मूळ जे आहे, ती आहे जाणीव शक्ती. 

 

आपल्याला क्रिया केल्याशिवाय गत्यंतर नाही. क्रियेचे मूळ अस्तित्व शक्तित असते. ते मूळ भगवंताला देण्यासाठी क्रियेचा हेतू कार्यामध्ये परिवर्तित होणे गरजेचा असतो. सर्व भगवंताला अर्पण करावे, म्हणजेच अंतर्मुख होणे.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

मी म्हणजे _आपले_ प्रश्न, मनोवृत्ती, संबंधित स्वभाव, पलीकडे होण्यासाठीचे प्रयत्न, शांतीचा शोध, व्ययक्तीकरण करणे, सर्वांगीण होणे, तात्पुरते वाटणे, शिथिल होणे, स्वतःचा कोष करणे, सार्वजनिक संबंध जोडणे, दोघांचेही मिश्रित स्वभावाचा ताण जाणवणे, सर्व स्वीकारणे, दोष निर्माण करणे, दोष न देण्याचे ठरवणे, दोष विलीन होणे....मानवी अस्तित्वाचे गुण धर्म माझ्यातही वावरत असतात म्हणून _मानवाचा प्रवास_ तो माझ्यातही होतो. 

 

 _प्रवासात_ खूप साऱ्या स्थिती, स्तर, कार्य, चक्र, संबंध, भाव, अनुभव, रूप, आकार, परिस्थिती, परिणाम - येत असतात, वावरत असतात, बदलत असतात, स्मरण ठेवत असतात, प्रश्न उभे करत असतात, त्रास देतात, कष्ट देतात, मार्ग शोधायला लावतात, सत्य ओळखायला लावतात. 

 

मानवी जीवाचा हा प्रवास दिसतोय. प्रवास स्वीकारू. स्वीकारणे म्हणजे तक्रार करू नये, सर्व भगवंताची शक्ती कार्य करते हे ओळखावे, शक्तीची लीला अनेकपणा दाखवते आणि प्रभाव पाडते असे मान्य करावे आणि त्यासाठी शांत होत राहणे. 

 

चिकित्सा करणे, कदाचित वाट्याला येत असावे. नाती, काम, स्वभाव, हे कोडी वाटतात, विषय वाटतात, त्यात दोष वाटतो. हा आपल्या मनोरचनेतून आलेला भाव असतो, की तसे _विचार_ येत राहणार आणि परिणाम होत राहणार. गुंतून राहण्यात कितपत तथ्य आहे, हे बघावे. स्पष्टीकरणाची गरज का निर्माण करतो आपण, हे ओळखावे. कुठलीही वृत्ती  सोडण्याचा हेतू असू नये, कारण सर्व काही भगवंताच्या शक्तीचे कार्य असते आणि स्थित होते. म्हणजे गोष्टी येत राहतील....ते आपण स्वीकारावे, देत रहावे आणि शांत व्हावे.

 

हरि ओम.

 


0 Comments:

Post a Comment

<< Home