Tuesday, June 02, 2026

श्री

 श्री 


कुणाला ठामपणे पूर्णतः माहित नसते की आपण इथे का आलो आणि कसे आलो. हा प्रश्न बौद्धिक पातळीच्या आणखीन पलीकडचा आहे, आतून येणारा आहे - जिथून सारे काही उगम पावते आणि चक्रा सारखे प्रस्थापित होते. 

आध्यात्मिक पातळीवरून विचारांचा अर्थ गूढ आहे, जो सूक्ष्मातून, अनेक कार्यांमुळे _उगम_ पावतो, ध्यानात येतो, स्तरातून येतो, साखळीत अवतरतो, बुद्धी, भावना, देह ह्या प्रकारे जाणवतो, भाव आणि स्मरण देतो, व्यवहार करायला लावतो, परिणाम दर्शवतो, चक्रात गुंतवून ठेवतो वगैरे. थोडक्यात तसे पाहिले, तर विचारांना देखील एक _स्वभाव_ आहे, जो भगवंत माध्यमामुळे रूपात साकार होतो. त्या स्वभावाला वेगळेपणाने बघणे, हे आध्यात्मिक मार्गातील महत्त्वाची कामगिरी ठरते जीवाची. 

वेगळेपणाने बघितल्यावर, आपण आणखीन सूक्ष्म असतो आणि मूळ शांती आहोत, हे जाणवते. मग विचारांच्या प्रभावाखाली (तात्पुरतेपण) आपण (जाणीव) राहत नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने शांती लाभते. जाणिवेचे *शुद्ध* स्वरूप म्हणजे *शांती*. 

त्यासाठी भगवंत माध्यमाचे चिंतन जरुरीचे असते.

हरि ओम.


श्री 

लपवणे हा relative भाग झाला. जेवढी आपल्याला परावलंबिक आणि relative गोष्ट जाणवते हेतू न ठेवता, तेवढे शांत आपण होऊ शकतो. इथे relative, परावलंबन, संबंध, एकाच अर्थाने आहे. ह्या वरील विश्लेषणात आपण "गुंतलो", तर त्याचा प्रभाव मनावर होतो आणि सुख - दुःखाची बाधा होते. गुंतू नये, असे कुणी म्हणत नाही. किंबहुना जन्म आहे, तर गुंतणे होणार. 

सांगण्याचे तात्पर्य की आपल्या मनोरचने प्रमाणे _ठराविक गोष्टी_ (गुंतल्यामुळे, संकल्पनेत वावरल्यामुळे, संबंधित राहिल्यामुळे, परावलंबिक असल्यामुळे) ध्यानात येतात आणि तसे स्मरण प्रस्थापित होते. मुद्दा हा आहे, की त्या ठराविक गोष्टीवरून स्वतःला आणि इतरांना आणि अस्तित्वाला आपण पूर्ण अर्थ देण्याचा प्रयत्न करतो आणि इथे आपली चूक होते. 

वरील निर्मिती संपूर्णपणे तात्पुरती असते, म्हणून आपल्या समजुती देखील तात्पुरत्या ठरतात (बदलणाऱ्या, वेगळ्या, संबंधित वगैरे). _ह्यावरून लोकांचे मतभेद होण्यास कारण ठरते_. ज्या लोकांना हे कळते की सर्व निर्मितीची इच्छा आहे, त्यांना ह्या मतभेदात राहण्याची काडीमात्र इच्छा नसते, किंबहुना मतभेदाचे स्थान त्यांच्या लेखी नसते. 

म्हणून लपवण्याच्या प्रवृत्तीतून बरेच काही दर्शनास येते. इतरजण आपल्यापासून काहीतरी लपवतात - त्यावरून स्वतःला लेखण्याची गरज नाही. आपण जसे सूक्ष्म होऊ, तसे आपल्या ध्यानी असे दिसून येईल की खूप लोकं खूप गोष्टी लपवण्याचा आटापिटा करत राहतात आणि आपल्याला दोष देतात की त्यांचे मन आपल्याला ओळखता येत नाही! वास्तविक आपल्या ध्यानात सूक्ष्म स्थिती वावरत असल्यामुळे इतर स्थूल भावनांकडे लक्ष जात नाही. त्याचे काही वाटून घेण्याची गरज नाही आणि आपण उत्तर किंवा स्पष्टीकरण द्यायला बांधील नाही, आणि त्या गोष्टी सांगताही येणार नाही.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home