Tuesday, March 04, 2025

श्री

श्री 

जाणीव सूक्ष्म होऊ देणे म्हणजे फक्त शुद्ध शक्ती राहणे, सिद्ध होण्याची गरज न बाळगता. 

सध्याची जाणीव अशी आहे की ज्यामध्ये द्वैत आहे, वेगळेपण आहे, तात्पुरतेपण आहे, आकार आहे, संबंध आहे, गुंतून राहणे आहे, क्रियाशी एकरूपता आहे, अनुभव येणे आहे, संकल्पना आहेत, चक्र आहे, विचार आणि भावना आहेत, विघटन आहे, अनेक स्तर आहेत. एकंदरीत ह्या क्रियेमुळे भाव उत्पन्न होतो, जो प्रतिक्रिया देण्याचा अट्टाहास धरतो, किंव्हा स्वतः निर्माण केलेल्या दृश्यात गुंतून राहतो, परिणाम भोगतो. ज्यात मी वेगळा वावरतो आणि त्यात तू वेगळा असतो, म्हणून तुझ्या बरोबर संबंध जोडून प्रपंच थाटतो. हे संबंध अनेक जन्म - मरणाच्या हालचालीत किंव्हा प्रवाहात गुंतून ठेवतात, म्हणून मूळ शक्तीकडे लक्ष विशेष जात नाही. 

शक्तीचे "जागे होणे" अभिप्रेत आहे. म्हणजे मूळ प्रकार ध्यानात यायला हवा, की जे आपण समजतो ते सर्व एकाच शक्तीचे कार्य आहे जी सगळीकडे स्थित आहे, जिला असे स्वतःचे काही रूप नाही, स्थळ नाही, काळ नाही, क्रिया नाही, हेतू नाही, स्वभाव नाही. ह्या सर्व अर्थाच्या पलीकडे ती शक्ती आहे, जिच्यातून हे सर्व अर्थ प्रकट होतात. अर्थ होणे म्हणजे मी होतो. शक्ती असणे, म्हणजे अर्थ होऊ पाहण्याच्या अगोदरची शांत स्थिती.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home