Sunday, May 18, 2025

श्री

 श्री 


आपल्या अनुभवातली परिस्थिती नेहमी बदलती असते आणि "अपूर्ण" असते. अपूर्णचा एक अर्थ असा की कितीही विचारांतून समजून घेण्याचा प्रयत्न केला, त्यात स्थळ आणि काळाच्या व्याख्या मिसळल्या, घटक, साखळी, स्तर, क्रियाची मांडणी केली, तरी आतील चलबिचल कमी होईल का? 

इथे प्रश्न असा पडतो, की आतील क्रिया का होते, कशी होते आणि त्यावरून कुठल्या भावना प्रकट होतात?! ह्याचे उत्तर मिळवण्यास वेळ देणे भाग आहे आणि बरेच उत्तर विचारांच्याही पलीकडे असावेत, गूढ असावेत, परिवर्तन झाल्यावर कळणारे असावेत. आपण चौकट कधी पार करू, हे गूढ प्रकरण आहे. गूढ जरी असले, तरी उतावळेपणाची गरज नाही. 

त्यासाठी श्रद्धा वाढवावी. श्रद्धा कुणावर? श्रद्धा, हा भाव, स्वतः सिद्ध करावा. म्हणजे शांती भाव प्रकट करावे. ते ही का करावं? कारण ते आपले मूळ स्वरूप आहे, असे संत सांगतात. मूळ स्वरूप ह्याचा अर्थ की शक्तीचा शोध सुरू राहणार आणि ह्याच बेचैनीतून शेवटी शांतीकडे आपण पोहोचू. जो पर्यंत आपण (जीव) अशी जाणीव राहते, तो पर्यंत आपण बेचैनच राहतो. बेचैन वाटणे ही एक अस्तित्वाची स्थिती आहे. त्या बेचैनीतून दृश्य जगाशी संबंध आपला येतो. This is called "vibrations". 

हा भाव कसा शांत होऊ द्यावा, हा जाणिवेचा *प्रवास* समजावा. म्हणून प्रवासात श्रद्धा वाढवावी. तसे पहिले तर पूर्ण अस्तित्व आणि त्याचे अनेक घटक, रूप, आकार हे निव्वळ श्रद्धेपोटी होत असते, दुसरा हेतू नाही! त्याची जाणीव जशी आपण आत्मसात करी, तसे आपले परिवर्तन शांती रसात होते. भगवंत हा जाणिवेचा भाग आहे, बाहेरील रूपाचा नाही. 

म्हणून कुठलीही परिस्थिती, कुठल्याही पद्धतीतून, कुठल्याही रूपात, कुठल्याही स्थळात आणि कुठल्याही काळात कधीही प्रकट होत गेली, तरीही तिचे पर्यवसान शांती रस प्रकट करण्यातच आहे. 

हे ओळखण्यासाठी नामस्मरणाचे महत्व आहे. आपण अपुरे आहोत, त्यात अनेक गुण, अवगुण ह्यांची सरमिसळ होत असते. त्यातून आपण भावनेत वावरतो किंव्हा इतरांच्या संबंधात येतो. मान्य आहे की आकलनाच्या पलीकडे अनुभव येतात आणि खूप काही देऊन जातात. 

जसे काही प्रसंगात लोकं येतात आणि निघूनही जातात वेळ आली की, प्रत्येक अस्तित्वाचा क्षण तेच खुणावतो. आलेला क्षण आनंदाने स्वीकारा आणि तीच भावना ठेवा. क्षण, येणे, जाणे हे अस्तित्वाचे गुण धर्म आहेत.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home