Monday, April 13, 2026

श्री

श्री 

विचार शांत झाल्याशिवाय भगवंताची जाणीव ध्यानात येणे अवघड. अस्तित्व भाव पूर्णपणे सगळीकडे भरलेले आहे आणि ते सूक्ष्म, स्थिर, शांत असते. अनंत रूप आणि आकार समजून घेण्यापेक्षा (ज्यांची निर्मिती कधीही संपत नाही), अंतर्मुख होऊन शांतीत स्थित होणे, हे हिताचे ठरते...कारण शांती भाव कायम राहते आणि ते अक्षर आहे, सत्य आहे. त्याला स्थळ, काळ, कार्य - कुठलीही चौकट लागत नाही...म्हणजे ते पूर्णपणे स्वतंत्र असते आणि पलीकडे राहते. हाच आपल्या असण्याचा *आधार* म्हणून होतो. सारे दृश्य जग, रूप, आकार, स्मरण, कार्य - ह्यांचा आधार हा अस्तित्व भाव आहे. 

विचार, भावना, देह - हे संबंध जोडतात...म्हणजे ते परावलंबित असतात, बदलत राहतात, ध्यानी बऱ्याच गोष्टी आणत राहतात. _चक्र कायम राहते_. चक्र मी करत नसतो, पण ते शक्तीमुळे *प्रस्थापित* होते. आणि त्यामुळे "मी" होतो आणि जग अनुभवतो आणि त्यात _गुंतून_ राहतो. शंकेचे मूळ इथे असते, की सत्य विचारातून किंव्हा रूपातून जाणून घेणे अवघड. भरभर गोष्टी करत राहणे, सतत गुंतून घेणे, अट्टाहास धरणे, सिद्ध होण्याचा खटपटीत राहणे, अस्वस्थ वाटणे - ह्याचे मूळ आहे की सत्य अजून आत्मसात झालेले नाही. 

संबंध प्रस्थापित होणे, ही भगवंताची इच्छा मानावी किंव्हा ओळखावी, _म्हणून हा अनुभव कुणालाही टाळता येणार नसतो_. ह्याचा अर्थ असा की ह्याच अनुभवातून शांती प्रस्थापित होऊ द्यायची असते. मार्ग इथूनच आहे. संबंधातून वृत्ती प्रज्वलित ठेवली किंव्हा हेतू ठेवला, तर व्याकुळता पदरी पडते. संबंध भगवत इच्छेने आले आहे, अशी जाणीव आत्मसात केली, तर मनाला स्वस्थता लाभते. ह्याचा अर्थ की मनाची तळमळ भगवत भाव प्रस्थापित झाल्याशिवाय, शांत होणे अवघड. भगवंताचे अस्तित्व म्हणजे शांती भाव.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home