Saturday, April 04, 2026

श्री

श्री 

 _अस्तित्व हा *भाव* असतो_. शुद्ध अस्तित्व पूर्णपणे अंतर्मुख, सूक्ष्म, विशाल, कायम, अक्षर अनुभव असतो किंव्हा कार्य असते. नाम घेत गेल्याने मनाची रचना तशी होत जाते. तशी होत असताना, त्या मार्गावर जात राहताना, प्रत्येक टप्प्यात द्वैताचा अर्थ आणि त्याच्याशी संबंध बदलत जातात. शेवटी आसक्ती पूर्ण विलीन होते आणि मनाची शक्ती पूर्ण सूक्ष्म होऊन स्थिरावते आणि शांती भाव संक्रांत होते. ह्याला बहिर्मुखापासून सुरुवात करून अंतर्मुख होणे असे म्हणतात. मन ही अस्तित्वाची स्थिती आहे. ती स्मरण प्रज्वलित ठेवते. ते स्मरण काहीतरी करण्यास परावृत्त करते. हा स्वभाव धर्म झाला मनाचा आणि त्यामुळे परिणाम होतात आणि मन कष्टी होते. 

वरील मनाचा स्वभाव स्वीकारायला लागतो. मनात येणारे विचार खूप गूढ अर्थाचे असतात, जसे की काल, आज, उद्या, विश्लेषण, संकल्पना, स्थळ, काळ, गेलेले लोकं, देवाची संकल्पना, प्रश्न, कोडी, शोध, स्वीकार, वगैरे. ह्या सर्वांगीण अर्थाने मन जिवंत राहतं आणि त्याचे कार्य चालू असते. एखाद्या घटकेचा विचार करू नये, हे सांगणे वेडेपणाचे असते, कारण विचार काय आणेल त्याच्या बरोबर हे सांगता येणे अवघड. म्हणून कुठलाही विचार स्वीकारायला लागतो. त्याला दाबून टाकू नये. 

विचारांची निर्मिती गूढ सूक्ष्म अशा स्तरातून होत असते, म्हणून विचारांची शैली, चक्र, संबंध, अर्थ, क्रियेचे स्वरूप त्या वासनेवर अवलंबून राहते. भलेही नंतर आपल्याला असे वाटले की क्षण वेगळ्या योग्य पद्धतीने घालवलेले चालू शकले असते (खंत), तरीही त्या क्षणाला *तोच* विचार येणे अभिप्रेत असतो, म्हणून तो येतो आणि परिणाम करतो. त्या अर्थानी, ती दैवी इच्छा ओळखावी. 

सावध होण्यासाठी आणि विपरीत परिणाम न होण्यासाठी, जे विचार येऊ पाहतात, त्यांना "पाहुणे" प्रमाणे बघणे, हाताळणे, स्वीकारणे आणि पुढे निरोप घेणे (हा संबंध) प्रचितीस आणायला लागतो (relationship *with* the thought itself). भगवंताच्या चिंतनाने असा संबंध साध्य होतो, असे सुचविणे आहे.

हरि ओम.


श्री 

उद्या मी विलीन होणार. जग त्याच्या रीतीने चालू राहणार. हाच नियम आहे आणि भगवंताची इच्छा आहे. जग असणे, वावरणे, हालचाली होणे, बदल होणे, गतिमान होणे हा सर्व भगवत इच्छेचा प्रकार असतो. आपल्याला त्या इच्छेची प्रतिभा मनात संक्रांत होऊ द्यायची असते. आपण स्थिर होणेच म्हणजे प्रतिभा आत्मसात केली गेली. स्थिर होणे आणि प्रपंचातील प्रसंग, विषय, अडचणी, समस्या, व्याकुळता, देहातील स्थिती ह्यांचा काहीही सरळ बौद्धिक संबंध नसतो आणि तो जोडूही नये. आपण काहीही घटकांना देणे लागत नाही सिद्ध होण्यासाठी. आपण फक्त भगवंताला देणे लागतो, म्हणून त्याचेच चिंतन करावे. स्वतः सिद्ध भाव आत्मसात होणे गरजेचा आहे.

प्रपंच आहे तसा असू द्यावे. प्रसंगे आणि परिस्थिती जश्या येत राहतील, तश्या येऊ द्यावे. त्यात भगवंताचे नामस्मरण कायम सुरू ठेवावे. न स्थळ, न काळ, न कृती - काहीही माझ्या हातात नसते आणि त्यांनी मी ठरत नसतो, हे पक्के ओळखावे. 

भगवंताचे चिंतन काय रूप दर्शनास आणेल, ही त्याची इच्छा. तो योग्य करेलच.

हरि ओम.


श्री 

सगळं गोल असते, म्हणजेच भगवंताचे कार्य असते आणि त्याचा विलास दर्शवते. 

लहानपण ते म्हातारपण म्हणजे परिवर्तित होणाऱ्या गोष्टी, ज्या गोल असतात. 

घर ते काम ते घर असा वेळ गोल असतो, कप्पा नाही. 

नाती, मित्र, मैत्रिणी, लोकं आणि त्यांच्याशी व्यवहार सर्व गोल असते, संबंधित असते. 

शिक्षणातील मुले, त्याचे प्रश्न, प्रतिक्रिया, कामाचे स्वरूप, विघ्न सर्व गोल असते...त्यांना लेखू नये. 

रात्र, पहाट, दिवस, दुपार, संध्याकाळ, रात्र - सर्व वासना गोल असतात. कुठलाही क्षण येतो आणि निघून जातो आणि इतर क्षणांना संबंधित आणतो. 

थंडी, उन्हाळा, पावसाळा हे ऋतू गोल असतात. ते येत राहतात आणि जात राहतात. 

आधीचे जन्म, आत्ताचा जन्म आणि नंतर येऊ पाहणारे जन्म गोल असतात, एकमेकात संबंधित असतात. आपण घाबरू नये. आज केलेले सत्कर्म कधीतरी उत्तम फळ देतेच. कर्म आणि फळ ही मर्यादित संकल्पना न बघता, सर्वांगीण प्रकार असते, हे ओळखावे. 

भगवंत भाव, जीवाचे स्मरण आणि भगवंत भाव हे गोल स्मरण असते. तो प्रवास पत्करायला लागतो. 

राग, दुःख, खंत, प्रेम हे परिवर्तन पावणारे गोल वृत्ती असतात. एकात गुंतून राहू नये...सर्वांचे रुपांतर प्रेमात होऊ द्यावे. 

मोकळा किंव्हा रिकामा वेळ, खूप धावपळ आणि परत मोकळा वेळ हे गोल असते. म्हणून जो क्षण येईल, तो मौल्यवान आहे, हे ओळखावे. 

शुद्ध स्मरण, विस्मरण आणि परत शुद्ध स्मरण हा गोल अस्तित्व भाव आहे. त्यात प्रत्येकाला जायचे असते आणि त्यातून मार्ग शोधायला लागतो.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home