Tuesday, May 27, 2025

श्री

 श्री 


मी जेव्हा व्यक्तीकडे बघतो तेव्हा आजकाल असे वाटते, की व्यक्ती त्याच्या त्याच्या दुनियेत दंग का होतो किंव्हा कसलेतरी विषय का निर्माण करतो?! जस लोहचुंबक काहीतरी स्वतःकडे ओढून घेतो आणि काहीतरी दूरही करतो. जवळ राखून ठेवणे किंव्हा दूर लोटणे, हे दोन्ही एकाच गुण धर्म मधून, क्रियेतून, समजुतीतून येतात. ती शक्ती एकच आहे, जी दोन्ही क्रिया घडवून आणते. 

म्हणून त्याच प्रमाणात, सारे वासना, रूप, आकार, घटक, परिणाम, स्मरण, भाव, संबंध एकाच शक्तीचे कार्य आहे. त्या शक्तीला _जीवाची शक्ती_ समजू. त्या शक्तीचा भाव असा असतो की ती अहं वृत्ती जागृत ठेवते म्हणून त्यामुळे होणारे सर्व परिणाम भोगायला लागतात. भोग, हा प्रकार असणार, जर जीवाचा भाव असेल तर. व्यवहारातला अर्थ हा की असमाधानात राहणे, कारण सतत काहीतरी हवे असते किंव्हा नसल्यामुळे चैन पडत नसते किंव्हा दूर लोटण्याची आशा असते किंव्हा पळून जाण्याची प्रवृत्ती असते. अशा प्रकारे आपले मन सतत दृश्याशी संबंधात राहते आणि कुठली ना कुठलीतरी परिस्थिती ओढून घेते/ निर्माण करत राहते. मन आहे म्हणून परिस्थिती आहे, तिच्या अर्थाची मांडणी आहे. 

भोगाला देखील दोन पद्धतीने बघू शकतो. एक म्हणजे नाईलाजाने दृश्याचे परिणाम सहन करणे, ह्याला भोग म्हणता येईल. दुसरा अर्थ भोग ह्या शब्दाचा म्हणजे _प्रसाद_. आपली नजर ठरवते की भोग नाईलाज आहे की दिलेला प्रसाद, ज्यामुळे स्वतःची सुधारणा होईल.

अहं भाव नामवता आला, किंव्हा जाणीव शुद्ध झाली, तर भोग प्रसादासारखे वाटतील. 

शुद्ध होणे म्हणजे बुद्धीच्या पलीकडे होणे, स्थिर होणे, निरहेतू होणे, सूक्ष्म होणे, स्वतः सिद्ध होणे, शांत होणे. 

हरि ओम

0 Comments:

Post a Comment

<< Home