Wednesday, May 21, 2025

श्री

 श्री 


प्रश्नाचे उत्तर फक्त बौद्धिक मार्गाने मिळते का हे बघावे. आपली तळमळ, त्रास, अपेक्षा, साखळी, भाव, क्रिया, संबंधांचे स्वरूप हे कुठून येते, ह्याचे उत्तर तरी कुठे माहित आहे?! ह्याचा अर्थ की सर्व निर्मितीची क्रिया आहे आणि त्या क्रियेच स्थान शक्तीतून उद्भवत असावे. आपण कुठून येतो, कसे येतो, काय करतो, का जातो, कुठे जातो हे प्रश्न बौद्धिक पद्धतीने एका मर्यादे पर्यंत नेतीलही. त्याला जोड श्रद्धेची लागते, म्हणजे भगवंत शक्तीचे अस्तित्व आणि कार्य आपण ओळखू लागतो. त्यावर अधिकाधिक भरवसा ठेवायला लागतो आणि निरहेतू होतो. किंबहुना बुद्धी शांत होते आणि त्याने थाटले गेलेले प्रश्न मावळू पाहतात. ह्याचा दुसरा अर्थ हा की कुठलाही प्रश्न, स्वतःच्या रूपा प्रमाणे प्रस्तुत होतो (निर्माण होतो, प्रकट होतो) आणि तो गुंतून ठेवतो. 

सर्व प्रश्नांचे मूळ मनोरचनेत आहे, जी वासनेतून निर्माण होते. परत स्वतःला सांगायला लागते की निर्मिती क्रिया स्वतः सिद्ध आहे, ती होणार, त्यातून साखळी येणार, त्यातून बरेच स्तर होणार, त्यातून येणे आणि जाणे होणार, त्यातून मर्यादा भासणार, त्यातून परिणाम होणार. इथे कुठेही खंडित कारभार नाही आणि सतत प्रवाह आहे. _हे असणार._ 

प्रवाह मध्ये शांत होणे, हे आपल्याला साधायचे आहे. सर्व गोष्टींचे स्पर्श होऊ देणे आपल्याला. कशालाही अडवू नये. सर्व स्तरांना सामोरे जात राहणे. सर्व येऊ देणे आणि जाऊ ही देणे. सर्व घडू देणे. सर्व हालचाली होऊ देणे. सर्वांचे स्थान प्रकट होऊ देणे. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home