Tuesday, May 20, 2025

श्री


श्री 

दृश्याशी संबंध आणि त्याचे रूप हे कसेही भिडायचे म्हणालो तरी फरक कसा होतो, हे ओळखावे. त्यातील प्रश्न म्हणजे दृश्य म्हणजे काय, ते का बदलत राहते, मी कोण, मी का बदलत राहतो, हा सर्व प्रकार काय आहे, हे सर्व कुठून येतं आणि कुठे जातं, ही क्रिया कशी होते वगैरे. 

 _आपले असणे_ , ही एक स्थिती आहे अस्तित्वाची. ती निर्माण केली गेली आहे आणि "निर्मिती" होणे, ही दैवी उद्भवलेली क्रिया आहे, म्हणून त्या क्रियेत मूळ स्मरण आपण विसरतो. हे कदाचित विधिलिखित असावं, म्हणून दृश्याशी आपल्याला भिडायला लागतं. त्यात दृश्य आपल्याला वेगळं वाटतं आणि म्हणून संबंध संकल्पना उदयास येते. त्या संबंधात इतके घटक असतात की त्यामुळे बेचैनी, तात्पुरतेपण, भीती, तळमळ ह्या भावना उदयास येतात. 

जी परिस्थिती असते आणि बदलत राहते, त्याचा आणि शांती मिळवण्याचा संबंध अजिबात नाही जोडावा. म्हणजे शांती संक्रांत होण्यास स्थिर व्हायला लागते, त्याचे उत्तर परिस्थितीच्या _मार्गातून_ शोधावे. परिस्थिती ही मानसिक जाळ आहे. जसे आपले मन, तशी परिस्थिती, हे विसरू नये. म्हणून भगवंताचे कार्य ओळखणे अत्यंत गरजेचं आहे. 

इथे कार्य म्हणजे येणे, होणे, वावरणे, जाणे आणि तसे होत राहणे सदैव. ह्या घडामोडी असणारच आहेत, आणि त्या हेतूच्या पलीकडे असावेत, म्हणजे त्याला होण्यास तसे कारण नाही. सूर्य म्हणलं तर त्याच्या पाठोपाठ सावलीची निर्मिती आली, तसे काहीसे आहे. 

म्हणून जे स्वतः सिद्ध आहे, त्याच्या पाठोपाठ हेतू (सावली) निर्माण झाला आणि हेतूच्या डोलारावर अनंत रूपे आणि आकार आणि त्यांचा संबंध. प्रश्न असा जाणून घ्यावा की सावली खरी की सूर्य?! 

गडबड काय होते की आपण सावलीला निस्तारण्याचा प्रयत्न करत राहतो. ती कशी पुसून जाईल?! आपले प्रयत्न चुकीच्या ठिकाणी आहेत, हे आपण मान्य करायला हवे पहिले. कुणी काही बोललं, मनाच्या विरुद्ध काही झालं, चढ उतार अनुभवास आले, शरीर जीर्ण झालं, तर आपण "दुखी" होतो, आपल्याला "राग" येतो...
 *हे का होतं?* 

माझ्या कॉलेज मध्ये असंख्य गोष्टी राबवण्याचा उपक्रम बजावण्यासाठी एक calender करण्यात येणार आहे. हजारो गोष्टी, पर्याय, choices, options, सांगितले तरी मूळ प्रश्न राहतो की कुणाचे "भले" होणार आहे? विद्यार्थ्यांचे भले होईल का? आणि ते कसे? 

हाच प्रश्न प्रपंचात विचारावा. काय मिळवून, धडपड करून, अट्टाहास धरून, उपद्व्याप करुन - स्वस्थ चित्त होणार आहोत का आपण? का खरे प्रश्न झाकून टाकायचे आहेत, म्हणून घेतला प्रपंच हातात?!! वास्तविक सत्य ओळखण्यासाठी आपण तैयारी करत आहोत की नाही, हे पारखावे.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home