श्री
एखाद्या क्षणात असे विचार किंव्हा भावना का येतात, हे माहित नाही, पण तसे ते येतात. स्थळ, काळ, कृती, व्यक्ती ह्यांच्यावरून संबंध घडतात आणि त्यांचा पाया असतो विचारांचे प्रकट होणे, वावरणे आणि निघून जाणे. जसा दिवस उगवतो आणि मावळतो, त्याला अनुसरून विचारांचे कार्य बदलत राहते. म्हणून काही वेळेला शांती भाव येईल, कधीतरी ताण येईल, तर कधीतरी आनंद होईल.
ह्याचे तीन अर्थ निघतात. एक म्हणजे बदल होत राहणे आणि ते नैसर्गिक मानून ते नुसते बघत राहणे आणि कृती करत राहणे. दुसरं म्हणजे भावनेला पकडून ठेवण्याचा अट्टाहास सोडणे. कुठलीही भावना दृश्याशी जी निगडित असते, ती अस्थिर राहते, म्हणून त्याकडे निरहेतू पद्धतीने बघावे - म्हणजे त्याचे वावरणे दैवी स्वरूपाचे आहे, हे जाणून घेणे. तिसरी गोष्ट ही, की ह्या प्रवाहातून स्थिर संकल्पना किंव्हा स्थिती कोणती, ह्या मार्गावर राहणे आणि स्थिरता मध्ये स्थित होणे.
पहिल्या पासून, कुठल्याही कालखंडात हेच मूळ प्रश्न असावे. बदल हळू होतो का वेगात होतो, त्यावर उत्तर अवलंबून नसावे. तो झाला परिस्थितीचा महिमा. बदलांचा वेग का वाढतो, ह्यावर एक उत्तर मनोरचनेवर आधारले आहे. दुसरा मार्ग हा, की बदलांचा परिणाम मनावर न होऊ देणे, म्हणजे कायम शांती भावनेत स्थित असणे.
असे अस्तित्वात काय आहे, जे कायम शांत असते? जे कायम राहतेच, जे समाधान भाव आणते, ज्याला काहीही लागत नाही, जे कमी जास्त होत नाही, जे बदलत नाही, जे व्यवहारिक स्मरण मागत नाही, जे बुद्धी भेदावर अवलंबून असत नाही?
हरि ओम.
श्री
आपले अस्तित्व किंव्हा व्यक्तिमत्व स्थळावर, काळावर, कृतीवर, गतीवर अवलंबून नसते. वरील बाहेरील रूपाचे उगम विचारात आणि भावनेत असते. म्हणून विचारांवर आणि भावनेवर नियंत्रण ठेवले, सत्य त्यांच्या भाषेत ओळखता आले, तर स्थळ आणि काळाचा आणि वेगाचा परिणाम योग्य होतो, विपरीत होत नाही.
कशानेही आपली *आतील शांती* भंग होत नसते, आपल्या मर्जी शिवाय. बदल किंव्हा काहीही कृती लादणे, हे आपल्यावर आहे की ते मानावे की न मानावे. मनाला काही लावून घेणे संबंधातून की त्याचे संस्कार विपरीत न उमटू देणे, हे आपल्या निर्णयावर ठरते. ही जाणीव प्रत्येकाला त्याच्या भाषेतून सिद्ध करावी लागते. म्हणून प्रत्येकाचा मार्ग वेगळा, पण ध्येय एकच.