श्री
श्री
त्याग म्हणजे सर्व वासना आणि त्यांच्यातून होणाऱ्या साखळीना विलीन करणे. त्याग बौद्धिक प्रयत्नातून सुरू होऊ शकतो (निश्चय), पण त्याला सर्वव्यापी किंव्हा सर्वांगीण स्वरूप येणे गरजेचे असते...म्हणजे तो भाव खूप आतून प्रकट होणे गरजेचे असते. हे दृश्य जग कुणालाही सुटलेले नाही. त्यात आपला जन्म झाला आहे, ह्याचा अर्थ की त्याचे स्थान असणार भगवंताच्या इच्छेत.
जन्म म्हणाल्यावर संबंधांचे कार्य निर्माण झाले आणि चक्र प्रस्थापित झाले आणि द्वैताचा अनुभव स्थित झाला. हे अस्तित्वाचे कार्य म्हणायचे. असे का असते, हे कुणालाही ठाऊक नाही. आपण फक्त शुद्ध भावनेने स्वीकार करण्याची शक्ती संपादन करावी आणि शांत व्हावे. गोष्टी अशा का असतात, परिस्थिती अशी का उद्भवते, हालचाली असे का होत राहतात, हे प्रश्न जरी वारंवार येत गेले, तरी त्यांना विलीन होऊ द्यावे ह्यातच आपले हित असते. विलीन होणे कुठलीही गोष्ट म्हणजे स्वतः आपण सूक्ष्म होत जाणे, अंतर्मुख होणे आणि ते साध्य प्रस्थापित होण्यासाठी नामस्मरण सतत करावे. त्याचा योग्य तो परिणाम होतो.
हरि ओम.
श्री
गोष्टी होत राहतात. तो अस्तित्वाचा गुण आहे. ते कसे, कधी, कुठे, का होतात - ती भगवंताची इच्छा असते. गोष्टींच्या स्वभावावरून अणि होण्यावरून किंव्हा कुठल्याही हालचालीतून (मग ते आतील असू किंव्हा बाहेरील) आपण ठरत नाही किंव्हा सिद्ध होत नाही (संपूर्ण बौद्धिक अर्थ लावण्याची गरज नसते). अशा अनेक स्तर आहेत,जे बौद्धिक भाषेत ओळखता येत नाहीत, तरीही त्यांचा शांत मनाने स्वीकार होऊ शकतो. थोडक्यात सर्व निर्मितीचा प्रकार आणि परिणाम अस्तित्व शक्तीतून उद्भवते, त्यात आपण एक निमित्त/ घटक/ स्मरण/ भाव/ जाणीव ठरतो.
हे लिहिणे देखील आपल्या रूपातून निर्माण होते, अर्थातच त्याची प्रतिभा भगवंताने दिलेली असते. आपल्यातून सुरुवात करून शांती पर्यंत स्थित व्हायचे असते. हा मार्ग. आपण इथे कसे आलो, का आलो, कधी आलो, कुठून आलो हे सर्व प्रश्न भगवंताला सोपवा, म्हणजे संपूर्ण परिस्थितीचा स्वीकार करावा. हाच आपला मार्ग.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home