Saturday, March 21, 2026

श्री

 श्री 


प्रत्येकाला भगवंत आपापल्या माध्यमातून, क्रियेतून, संबंधांच्या रूपातून, साखळीच्या रचनेतून *प्रस्थापित* करायला लागतो. म्हणजे हेच, की सर्व रूप आणि आकार आणि परिस्थिती आणि त्यातील संबंध हे भगवंताच्या *इच्छेने* येत राहतात. आपण जीव म्हणून जे होतो, वावरत राहतो आणि निघून जातो, हे ही भगवंताच्या विलासात होते. 

भगवंताच्या इच्छेला किंव्हा कार्याला कारण "नसते" किंव्हा निमित्त "नसते". आपल्या रुपाची सवय अशी आहे, की ते "मूळ" सापडल्याशिवाय गप्प बसत नाही. एका अर्थी हा शोध म्हणावा. 

विचार धारा किंव्हा स्पंदने ह्यावर कुणाचाही ताबा नसतो. ते भगवंताकडून आलेले असते, म्हणून त्यातून अनुभव येत राहतात प्रवाह प्रमाणे. ते _दुरुस्त_ करण्यात आपली शक्ती खर्च होत राहते कारण _दुरुस्त करणे_ ही जीवाच्या रूपातून आलेली संकल्पना आहे. परिणाम, जो भोगला जातो, तो आत आणि बाहेर असा उमटत राहतो किंव्हा जाणिवेत येतो. म्हणून _गुंतण्याचे प्रश्न_ निर्माण होतात. इथे प्रश्न म्हणजे परिस्थितीच्या रूपाचे चिंतन करणे आणि शांतीचा शोध होणे. 

ह्याचा अर्थ हा की काही प्रश्न खूप आतील मनस्थितीचे असतात. कदाचित ते आत्म्याचे असतात. त्याचे उत्तर अंतर्मुख होण्यामध्ये सापडते. 

अंतर्मुख होण्यासाठी प्रयत्न लागतात. पूर्ण अंतर्मुख होण्यासाठी भगवंताची कृपा लागते. 

मी जेव्हा बघतो व्यक्तींच्या व्यवहाराकडे, तेव्हा असे जाणवते की विषय किंव्हा कोडी परावलंबित झाल्यामुळे सर्व घोळ झालेला दिसतो आणि त्यात खूप गुंतणे होते. त्यातून त्याग आणि आपुलकी येणे, हे गूढ प्रकरण आहे आणि त्याला वेळ द्यायला लागतो. 

भगवंताची कृपा असतेच. ती जाणवण्यासाठी आपल्याला मार्गावर जावे लागते. तो मार्ग म्हणजे विघटित स्थळ आणि काळ ह्यातील धागा ओळखून सर्व एकच सत्य आहे, ही जाणीव होईस्तोवर प्रवास करत राहायला लागतो. मनाची रचना अशी की एकाच वेळेला एकाच गोष्टीचे दर्शन घडेल, मग त्यातून पुढचे दर्शन. असे करत करत, विचार आणि भावनेच्या माध्यमातून सर्व दर्शनाचा रोख भगवंत आहे, हे जेव्हा जाणवेल तेव्हा शांती रस प्रस्थापित होईल.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home