Tuesday, October 08, 2024

श्री

 श्री 


गती किंव्हा बदल भासत राहणे ही अस्तित्वाची स्थिती आहे. त्यात दोन्ही अनुभव किंव्हा जाणिवांचे स्वरूप मिसळले असते. एक आहे ती शुध्द जाणीव आणि दुसरा आहे तो द्वैताचा अनुभव, क्रिया, परिणाम.  अश्या प्रकारे आपण जिवंतपणा अनुभवतो. आपण कायम असतो. बदल किंव्हा झिजणे किंव्हा तात्पुरते वाटणे हा भाव आहे. तो निर्माण झालेला आहे, म्हणून तिथे आपले मन चिकटले आहे. मन काहीही निर्माण करू शकते. ह्याचा अर्थ मन स्थिरावले तर भगवतस्वरूप आपण होऊ. हा सध्या पर्याय जरी वाटतं असला तरी ते खरे आणि सत्य स्वरूप आहे, असे संतांचे सांगणे आहे. म्हणून बुद्धी सूक्ष्म होऊन स्थिर व्हायला लागते म्हणजे त्या सत्याचा अनुभव येतो. पर्याय म्हणाले तर फायदे तोटे वगैरे अशी व्यवहारी संकल्पना आली - ज्यामुळे बुद्धीला स्वस्थता मिळत नाही. पर्याय भगवंताला संबोधित करणे म्हणजे इथेच मनाचे चुकते कारण भगवंत आपण तोलून तपासून स्वीकारतो असे म्हणणे झाले!! म्हणजे की भगवंताकडे हेतूच्या चष्म्यातून बघणे. असे केले तर भगवंत पर्याय म्हणूनच राहील, तो सत्यात अवतरणार नाही!! 

सत्य म्हणजे तो भाव सर्वव्यापी होतो, सर्व स्तरांवर पसरतो आणि सगळ्या गोष्टींचे स्वरूप तिथेच नेऊन पोहोचवतो असे आपण ओळखू शकतो. 

दृश्य संपत नाही. आकार येत राहणार. तरी त्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज उरणार नाही, असे मन शुध्द व्हायला हवे. परत हा मार्ग खरा आहे, हे जाणल तर तो मार्ग पत्करू. त्यावर कोणतीही परिस्थिती आली, तरी तो मार्ग सोडणार नाही, त्या निश्चयात राहणे महत्त्वाचे आहे. 

कुणी काहीही बोललं, त्यातून आपली प्रतिक्रिया ठरू नये, मी ठरू नये, जवाबदारी ठरू नये. पर्याय मानला तर तसे होते. भगवंताचे अनुसंधान ठेवले तर कार्य मनाला चिकटत नाही किंव्हा मन दृश्यात गुंतत नाही. मग प्रसंग कसाही असला आणि आपण कार्य केले तर आपण शांतच राहतो. कारण चालना देणारी शक्ती सूक्ष्म, विशाल आणि गूढ असते, म्हणून दृश्याचा उगमही गूढ असला पाहिजे. आपण कार्य करत राहावे. जे होईल ते योग्यच होईल, अशी श्रद्धा बाळगणे.

बुद्धी आली रे आली की खूप साऱ्या भावना आणि संबंध त्यावर पाठोपाठ येतं राहतात. म्हणून त्यागाचा मार्ग प्रत्येकाचा वेगळा असतो आणि जो प्रसंग आला आहे, तो त्यानेच स्वतः स्वीकारायला लागतो आणि पार पाडायला लागतो. आलेले प्रसंग भगवंताने दिले आहेत, ह्या भावनेत श्रद्धा ठेवा. तो आपल्याला सोडणार नाही. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home