Friday, October 24, 2025

श्री

 श्री 


आपण जो प्रपंच _अनुभवतो_, त्याला अनेक स्तर, चक्र, स्थिती, बाजू असतात. सर्वांचे कार्य चालू असते आणि त्यातून तसा अनुभव स्थित होतो. जसे आपले त्या कार्याशी संबंध असतात, तशी आपली भूमिका असते प्रपंचात आणि तसा परिणाम होत राहतो आपल्यावर. कार्याचे घटक आणि अहं भाव (मी) हे खूप गुंतले असतात, म्हणून त्याला _निरहेतू_ पद्धतीने बघणे, ह्याला प्रयत्न लागतात. ते फक्त बुद्धीच्या भाषेत मर्यादित नसते. म्हणजे बुद्धीने समजून घ्यावे, पण त्याच्या व्यतिरिक्त इतर घटकांच्या माध्यमातून देखील जाणून घ्यावे लागते. 

जाणून घेणे ही क्रिया परत फक्त मुद्दामून नसावी. त्यात निष्ठा, श्रद्धा, कृपा हे भाव लागतात जाणून घेण्यात. थोडक्यात "आपोआप" होण्यामध्ये श्रद्धा ठेवावी. 

ह्याचा लहानसा घटक म्हणजे कुठल्या गोष्टी आपण लक्षात ठेवतो आणि कुठल्या गोष्टी नगण्य वाटू शकतात. हे ज्याने त्याने बघावे. गोष्टींचा संबंध आपण कसा लावतो, त्यातून स्मरण आणि लक्षात राहणे क्रिया प्रकट होते. तरीही हे प्रकरण गूढ आहे. म्हणजे गोष्टींवरून दुसऱ्याला लेखू नये. प्रत्येक जीव त्याच्या प्रवासात असतो, म्हणून परिवर्तनाचे स्वरूप प्रत्येकास वेगळे असते आणि एकमेकांवर बुद्धीने पूर्णपणे अवलंबून नसते. हे एकदा मान्य केले, की श्रद्धेने सैय्यम ठेवावा. त्रास करून घेऊ नये. त्याची गरज नसते.

हरि ओम.



श्री 

अस्तित्वात सर्व गोष्टी *राहणार* - म्हणजे बदल, स्तर, साखळी, भाव, स्मरण, संबंध, क्रिया, विचार, भावना, संकल्पना, प्रश्न वगैरे. ह्याचा वावर सदैव अनुभवात होत राहणार.  होणे, रूप घेणे, तात्पुरते वाटत राहणे, स्थिरावण्याचा मार्ग पत्करणे, सत्य ओळखणे हे होणार. काही लोकांनी त्याला _विधिलिखित_ म्हणलं आहे, म्हणजे *कार्य* दैवी उद्भवत आहे, म्हणून त्यातून सर्व काही दैवी इच्छा किंव्हा संकल्पना मानावी...तशी ती असतेच. 

वरील गोष्टीतून आपल्यासाठी दोन संकल्पना प्रत्ययास येतात - कर्तव्य आणि कार्य. 

कार्य दैवी उद्भवत असल्यामुळे, त्याला अमुक एक कारण नसते स्थित होण्यास. तसे सारे घटक स्वीकारावे लागते. होण्यास आणि असण्यास गूढ भाव आहे, म्हणून खूप चिकित्सेत पडण्यात विशेष उपयोगाचे ठरत नसावे. जे आहे, ते आहे. जसे आहे, तसे आहे.

व्यवहारात हेतूच्या पलीकडे वृत्ती स्थिरावली, की कर्तव्य उदयास येते. कर्तव्य, ह्याच्या सर्व घटकांचा पलीकडे संबंध असतो, म्हणून त्याला महत्व आहे. तोच कर्तव्यशील असू शकतो ज्याचे मन अत्यंत स्थिर झाले असते. 

जर आपला भाव स्थिर होऊ शकला, तर त्याला कशाचीही लागण होणार नाही. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home