श्री,
काटा ने काटा काढावा आणि शेवटी स्वतः पकडलेला काटा देखील टाकून द्यावा. मोकळं व्हावं.
आपली सुरुवात बाहेरून असते. दृश्य, जग, आकार, बदल, बुद्धी, भावना, परिस्थिती, वस्तू या सर्व गोष्टी आपल्याला बहिर्मुख करतात - तशी मनाची धारणा असते. जिथं पर्यंत "मी" ही संकल्पना जागी आहे किंव्हा भाव आहे, तिथं पर्यंत आपण बहिर्मुख आहोत. म्हणजे परावलंबी आणि दुसऱ्यांचे दोष पाहण्यात स्वारस्य बाळगतो.
तीच बहिर्मुख वासना "आत" वळवायची असते - म्हणजे स्वतःतील दोष समजून घेणे, सूक्ष्म होणे, श्रद्धा वाढवणे, मदत करणे, चिंता किंव्हा त्रास किंव्हा राग न उमटणे. म्हणजे कुणावर किंव्हा कुठल्या परिस्थितीवर स्वतःच अस्तीत्व न परावलंबी करणे, स्थिर होत राहणे, शांत होणे, प्रेम करणे, हेतू मर्यादित न राहणे, सर्व एकच आहे हे ओळखणे, वेगळेपणा सरणे.
शेवटी पूर्णपणे आतली उगम पावलेली सूक्ष्म वासना शांत करणे - म्हणजे भगवंत प्रकट करणे आणि त्याच स्थितीत कायम राहणे. सर्व कार्य तोच करतो अशी जाणीव होणे. शुध्द अस्तीत्व होणे. पलीकडे राहणे.
ह्याला म्हणतात काटा ने काटा काढावे आणि शेवटी आतला काटा ही नाहीसा करणे.....थोडक्यात काटा निर्माण झाला आहे दिव्य कार्यातून. त्याला "सोडणे".
हरि ओम.
श्री,
विचारांनी त्रासून जाण्याची गरज नाही. तसा त्रास आपण निर्माण करतो कारण तशी मनाची धारणा झाली आहे.
विचार *शक्तीच* स्वरूप आहे - त्याच अस्तीत्व "मी" च्या अगोदर पासून आहे. क्रिया असणे, कार्य होणे, स्तर असणे ह्या गोष्टी अगोदर आहेत, अनंत काळा पासून आहेत. आणि त्यात "मी" सतत येतो आणि जातो. एखादी गोष्ट सतत घडली की ती "कायम" असल्याचा "भास" होतो, किंव्हा तसा अनुभव निर्माण होतो.
खरं पाहिलं तर कायम काय आहे? तिचा अर्थ आपल्याला कळलेलं नाही म्हणून बदलांना कायम मानतो किंव्हा धरून ठेवतो. विचारांची निर्मिती देखील इतक्या सूक्ष्म स्थितीतून होत राहते, की त्याचा ही ठाम पत्ता लागणे अवघड जातं म्हणून विचारांना आपण कायम आहे, असे मानतो आणि विचारांच्या पलीकडे स्थिती आहे, अशी कल्पनाही येत नाही, अनुभवही नाही!! म्हणून घाबरायला होत, कारण _विचार_ हे निर्मितीतून आलेलं आहे, म्हणून तोच स्वभाव घेऊन आलेलं आहे.
सत्य होणे किंव्हा कळणे हा विचारांचा स्वभाव "नाही". म्हणून सत्य कळण्यासाठी एक विशेष प्रक्रिया लागते. आपल्यासाठी ती प्रक्रिया विचारांनी धारण करायला लागते आणि विचार सूक्ष्म करत शांती अनुभवायला लागते.
हा झाला प्रवास.
हरि ओम.