श्री: काही विचार...
श्री: काही विचार...
_विचारांच्या_ धारा प्रस्थापित होत राहतात अस्तित्वात, ज्याचा _परिणाम_ म्हणजे स्मरण, भाव, चक्र, भोग असा काहीसा होत राहतो. ह्याला _कार्य_ असे म्हणावे, ओळखावे. ह्या कार्यात "जीव" असे एक रूप आणि आकार होते, ज्याची देखील एक स्मरणाची संकल्पना प्रस्थापित होत राहते आणि गुंतत ठेवते दृश्यात. असे हे दर क्षणात घडत राहत. ह्याचे तात्पर्य असे आत्मसात व्हावे लागते, की "हे सर्व होत राहणार/ आपण होणार/ आपण येणार आणि जाणार/ साखळी असणार/ शोध होणार/ संबंधात सारे गोष्टी येत राहणार/ चक्र असणार, म्हणून सुरुवात आणि शेवट माहीत नसणार/ दृश्याचा अनुभव संक्रांत होत राहणार/ व्याकुळतेचे कारण शोधत राहणार/ जाणिवेचे स्थान माहित होणार/ मार्ग दर्शित होणार/ _स्वीकार_ होणार".
स्वीकारणे म्हणजे सर्व होऊ देणे आणि शंका घेऊ नये, अट्टाहास बाळगू नये. हालचालींचे सर्व स्तरातले रूप (ते दिसू दे किंव्हा नको दिसू दे), स्वीकारले जाणार. जिथे इंद्रिये पोहोचू शकत नाही, तिथे श्रद्धा पोहोचते. शांतीचा मार्ग श्रद्धेतून आहे.
वरील स्वीकार होण्याच्या भावनेला "ऐकणे" असेही म्हणून शकतो आपण. इतरांचे किंव्हा इतर जीवांचे नुसते ऐकावे. त्यातून आपुलकीची वाट जाणवते. ऐकणे, हे कार्य बनावे, ज्यामुळे मन सूक्ष्म होत, देहाच्याही पलीकडे जाऊ शकते. ऐकून सुचविणे असते, मार्गदर्शन होणे असते, संबंध जोडणे असते. इतरांच्या बोलण्यातून किंव्हा न बोलण्यातून ऐकणे ठरत नसते. ऐकणे, हे होत राहायला हवे प्रत्येक क्षणात. त्यातून भगवंताची जाणीव ऐकली जाते.
प्रत्येक जीव प्रवासात असतो. प्रवास ज्याचा त्याला स्वीकारावा लागतो. म्हणजे त्यात उंचवटे आणि खड्डे, दोन्ही येत राहतात आणि ते कुणामुळे किंव्हा कशामुळे येतात, ह्याने चिंतीत असू नये. मन म्हणलं, तर परिस्थिती प्रस्थापित होत राहणार आणि असंख्य गोष्टी जाणवत राहणार. प्रतिक्रिया द्यावी, असे काहीही नसते. मनातील गोष्टी इतरांना कळावे, ह्यावरून शांती निर्भर नसते. शांती प्रस्थापित होणे, हा वैयक्तिक मार्ग असतो, तो स्वीकारा. तो कसा संक्रांत होईल, हे गूढ कार्य मानावे, जे सर्वांगीण स्तरात स्थित असते आणि _उगाचच_ बुद्धी किंव्हा भावनेला कष्टी करू नये. सर्व योग्यच होते.
हरि ओम.
