श्री
नामाचा अर्थ खूप मोठ्ठा आहे...
नाम ही शक्ती आहे विश्व निर्माण करण्याची. शक्ती म्हणलं तर त्यात कार्य आले, क्रिया आले, संबंध आला, परिणाम आला, भाव आला, जाणीव आली, अनुभव आला, चक्र आलं.
नाम म्हणजे शक्तीचे अनेक स्तर. एखाद्या स्तरात आपण असतो आणि त्या प्रमाणे अस्तित्वाचे _स्मरण निर्माण_ होते. म्हणजे स्मरण स्तरावर ठरते. कुठल्याही स्तरावर अस्तित्व शक्ती असतेच कार्य करत, म्हणून नाम घेत असताना सूक्ष्म स्तरा पर्यंत आपलं परिवर्तन होत राहतं.
नाम घेणे म्हणजे वासना क्षीण होणे आणि त्यातून होऊ पाहणाऱ्या कृती क्षीण होणे. थोडक्यात वासना विलीन झाली किंव्हा शांत झाली की जाणीव पूर्णपणे सूक्ष्म होऊन शुद्ध अस्तित्व शक्तीचे दर्शन होते.
जगात वावरणे म्हणजे शक्तीच्या एका स्तराचे दर्शनच असते. दर्शन म्हणलं, तर त्यात " मी करता आहे " ह्या भावनेला स्थान असू नये. म्हणजे नामाने अहं वृत्ती क्षीण होत जाणे अभिप्रेत आहे.
नाम घेणे म्हणजे मायेचा लोप होणे. माया देखील शक्तीचे एक दृश्य चिन्ह आहे, ज्यात मन, स्मरण अशा गोष्टी गुंतल्या असतात आणि वेगवेगळे वाटतात. नाम घेत गेल्यावर, अहं वृत्ती क्षीण झाल्यामुळे, त्याच बरोबर मायेचा परिणाम क्षीण होत जातो. शेवटी मायेचा पूर्ण अभाव होतो आणि समाधान भाव प्रकट होते.
नाम हा प्रवास आहे, जो बिंदू पासून (चिकटण्या पासून) ते आकाश पर्यंत (मोकळे होण्या पर्यंत) घडवून आणतो. म्हणजे _गोष्ट_ निर्मिती असते, तिला प्रत्यक्ष तसं काही मुल्य नाही. किंव्हा गोष्टीचे उगम, वावर, संबंध, निघून जाणे - ही भगवंताची शक्ती ठरवते, आपण नाही. म्हणजे ती शक्ती कायम असतेच अस्तित्वात.
नाम घेणे म्हणजे विघटन क्रिया विलीन होणे. विघटन विलीन होणे म्हणजे एकच गोष्ट किंव्हा सत्य सगळीकडे दिसणे, त्याचे दर्शन होणे.
नाम घेणे म्हणजे संकल्पना वस्तूपासून ते शुद्ध आकाशा पर्यंत होणे. भगवंत सत्य भाव आहे, अद्वैत आहे, स्थिर आहे, शाश्वत आहे, कायम आहे....तो वस्तू नाही.
नाम घेत गेल्यावर बुद्धिभेद मंदावते आणि ती मंदावत असताना श्रद्धा भाव प्रज्वलित होत जाते. म्हणजे आपण स्वतः शांत होतो. जगात सर्व चांगलच होत आणि ते योग्य होतं, ही श्रद्धा मनात उदयास येते. काही अपेक्षा राहत नाही, हेतू नाही, अट्टाहास नाही, चिंता नाही, त्रास नाही. म्हणजे सर्व घटकांच्या पलीकडे मन अस्तित्वात राहते, म्हणजे ते सूक्ष्म आणि शुद्ध होते.
हरि ओम.